सिरत सातपुते, सामाजिक कार्यकर्त्या | 4 April, 2019
संविधानावरील चर्चा संपली आणि मगापासून खुणावणारं आतलं दालन बघायला निघाले. दारातुन आत शिरताना पाय जड झाले. चालवेचना!! जे दिसत होतं ते इतकं अद्भूत होतं की जमिनीला खिळून उभीच राहिले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाशी जोडलेल्या इंदापूरमधल्या राजेश कुलकर्णी या मातीशी लिलया खेऴणा-या कलाकाराने जे काही बनवलं होतं ते कल्पनेपलिकडचं होतं.
आकार आर्ट गॅलरीत राजेशने बनवलेल्या विविध वस्तू बघितल्या होत्या. त्याच्या बरोबर ब-याच वेळा चर्चाही झाल्या होत्या. त्यामुळे हे पाणी काहितरी वेगळं आहे हे जाणवल होतं पण इथे या कलाकृतीतून दिसलेला राजेश हा बावनकशी सोन्यासारखा लखलखत होता. आकार आर्ट गॅलरीत बघीतलेली मडकी, मुखवटे, विविध आकाराच्या वस्तू हे सगळं तारांच्या जाळ्यातून लटकत होतं मुक्तपणे. आतापर्यंत राजेशचं बघीतलेलं काम हे सर्व कुठेतरी एका सुत्रात बांधून समोर आलं होतं आणि पटकन डोक्यात प्रकाश पडला हा इतका प्रतिभावान माणूस एका छोट्याशा खेड्यात काय करतोय ते!!
माती हे माध्यम घेऊन विचारांना मूर्तपण देणारा हा मनस्वी कलाकार विचार प्रत्यक्षात आणणारा तो क्षण जपू पाहतोय आणि तो क्षण तिथेच संपला की क्षणभंगुरता अनुभवत तिथेच थांबतोय. विचारांच्या आवर्तनात जगताना हे दंद्व सहज पेलतोय आणि मग ही अशी विलक्षण कलाकृती निर्माण करुन परत एकदा आवर्त पोकळीत जायला सज्ज होतोय. गावात राहून विविध समाजघटकांची वीण पक्की करण्याचा प्रयत्न करतोय आणि मातीशी सलगी करत आपल्यातल्या कलाकाराला फुलवतोय आणि भवताल प्रगल्भ करतोय.
या प्रदर्शनात विचारांवर केलेला विचार, त्या विचाराच्या उर्जेचं परिवर्तन नवीन विचारांत होणं आणि ही प्रक्रिया प्रवाही असणं हे असचं तर चालू असतं संवेदनशील मनात. आणि मग समाजभान असलेलं मन मग नुसते सृजनाने तृप्त होत नाही तर कायम अस्वस्थता घेऊनच वावरतं सदा नाविन्याचा व नवनिर्मितीचा ध्यास घेत सकल समाजाच्या आनंदासाठी. राजेशचा हा ध्यास या कलाविष्काराच्या निमित्ताने समजला ही या बिनालेला येण्याची माझ्यासाठी फलनिष्पत्ती!!

