सतीश शिर्के | व्यवस्थापक, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक | 17 February, 2017


केरळला जातोय असं समजल्यावर अनेक ‘जाणकारांनी’ तिथे काय काय बघायचं याची यादी द्यायला सुरुवात केली. पण मला केरळ फिरायला जायचं न्हवत. एखाद्या राज्यात फिरायला जायला लागणारा वेळ आणि पैसा दोन्हीही माझ्याकडे नाहीत. पण तरीही मी निघालो होतो कारण जे पाहायला जात होतो ते चुकवू नये असं काहीतरी होतं. केरळमधील फोर्ट कोची शहरात दर दोन वर्षांनी भरणारं कलेच्या सर्व आविष्कारांच जागतिक प्रदर्शन सुरु झालं होत. मी काही चित्रकार वैगेरे नाही त्यामुळे हे मला माहित असण्याच काहीच कारण न्हवत. पण ज्या आकार पॉट आर्ट ने आयुष्याला दिशा दिली त्यांचं एक installation या भव्य प्रदर्शनात लावलं होत. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हे प्रदर्शन पाहायला जाणे म्हणजे आकारच्या प्रवासातील महत्वाच्या घटनांचे साक्षीदार होण्याची धडपडच आणि सोबतच जगभरातून आलेल्या कलाकारांचे सर्वोत्तम अविष्कार पाहणे हे त्याला जोडलेले प्रलोभन. कोची मुझारीस बिनाले २०१६ या नावाने सुरु झालेलं आणि जवळपास साडेतीन महिने चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनाच हे तिसरं वर्ष. संपूर्ण फोर्ट कोची परिसर आणि एर्नाकुलमच्या काही भागात ठिकठिकाणी मांडलेल्या उत्तम कलाकृती नीट पाहायला खर तर किमान आठ दिवस हवेत. कोची बिनालेची मांडणी तीन प्रकारात पाहता येते. १२ मुख्य कलाकृतींची ठिकाणे व २० official collateral आणि त्याचबरोबर Students Biennale, Artist Cinema, विद्यार्थ्यांच्या कलाकृती, सांस्कृतिक कार्यक्रम अशा ठिकठिकाणी पेरलेल्या उपक्रमांची रेलचेल. या प्रदर्शनाची भव्यता, नकाशा हातात आल्यावर लक्षात येते. शहराच्या सर्व भागातील निवडक वास्तूंमध्ये हि मांडणी आहे.
पुण्यातील ८ कलाकारांनी मिळून मांडलेले Roots / Routes हे दालन, मांडणी आणि त्यामागच्या विचारांच्या पातळीवर खूप वेगळ वाटल. पाहून समाधान मिळणाऱ्या काही मोजक्या कलाकृतीमधलं हे दालन. समजून घेतल्याशिवाय बाहेर जावस वाटत नाही. आकार पॉट आर्ट च्या राजेश कुलकर्णी यांनी यामध्ये Roots / Routes च्याच थीममध्ये एक निराळ्या शैलीतील पाहण्यासारख installation केलं आहे. कोचीच्या या २ दिवसातील वास्तव्यात हे शहरपण फार आवडल. इथली घरं, गल्ल्या,रस्ते आणि एकंदर बाजारपेठ हि इंग्लिश सिनेमातील वाटावी अशी. अतिशय शांतपणे सर्व व्यवहार सुरु. उत्तम रचना असलेल्या या बहुतेक घरांवर होमस्टे चा बोर्ड आणि ठिकठिकाणी घरांमध्ये , हॉटेलमध्ये महिला सर्व व्यवहार बघताना दिसतात. सर्व देशातील पर्यटक येत असल्याने सर्व प्रकारचे जेवण देणारे हॉटेल इथे आहेत. सर्व काही पर्यटन व्यवसायावर अवलंबून असूनही इतर सर्व पर्यटन स्थळी दिसणारी व्यावसायिक वखवख इथे अजिबात दिसत नाही, हे एक विशेष. हा प्रवास तसा निघांचा. आयुष्यभराच्या प्रवासात साथ देण्याचे आश्वासन कॉलेजपासून प्रत्येक पातळीवर प्रामाणिकपणे निभावत असलेले आम्ही ३ मित्र. निशांत, सुधीर आणि मी… अगदी गांधीजींची ३ माकडे ते ३ Idiots अशी घट्ट मैत्रीची सगळी विशेषणे आम्हाला लावली जातात. पैकी निशांत चित्रकार आहे. जाताना तिघे असलेलो आम्ही तिथे मात्र चौघे झालो.
राजेश कुलकर्णी यांनी आपला संपूर्ण वेळ देवून कोची बिनाले पहायची ‘दृष्टी’ दिली. राजेश सरांसोबत इतका वेळ असणे म्हणजे अनेक विषयांवर चर्चा करण्याची पर्वणीच. त्यामुळे बिनाले पाहतानाच प्रत्येक गोष्टीतील सामाजिक संदर्भ शोधणारी त्यांची संवेदनशील नजर installation शिवायही खूप काही देवून गेली. त्यांच्याशिवाय बिनाले पाहणे म्हणजे नुसतीच सैर झाली असती असे आता जाणवते आहे. इथे मसाले, चहा, अत्तर आणि अजून काय-काय प्रसिध्द असलं तरी या फेरीमध्ये शॉपिंगला सुद्धा वेळ ठेवलेला न्हवता त्यामुळे पुढच्या वेळेसाठी म्हणून अनेक गोष्टी ठेवूनच कोचीचा निरोप घेतला. हे सर्व पाहताना माझी लेक स्वरासह आणखी काही जवळच्या लोकांना सतत मिस करत होतो. आता दोन वर्षांनी होणाऱ्या बिनालेला स्वराला घेवून जाण्याचं ठरवून आजपासूनच पाचचा कॉईन डब्ब्यात टाकला. अभिव्यक्तीच्या निरनिराळ्या माध्यमातून व्यक्त होवून व्यक्ती आणि समाजाच्या वैश्विक जाणीवा उच्च प्रतीच्या, अनोख्या मांडणीतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे कोची मुझारीस बिनाले २०१६ हा आतापर्यंतचा अविस्मरणीय अनुभव ठरला. आदिम काळापासून मानवी जीवन समृध्द करणाऱ्या कलेला समजून घेताना माझ्यातील कलाविषयक जाणिवांची रंध्रे मात्र अक्षरशः मोकळी झाली.
