राजेश कुळकर्णी | डोंबिवलीकर – दिवाळी अंक, २०११
“ तूमी म्हंता म्हनून मी भट्टी लावेल, पन भाजताना भांडी तुटली तर आपल्यावर नाय. पयलेच सांगून ठिवतोय.”
इंदापूरच्या बाजारात भेटलेल्या एका कुंभारमामांना आम्ही भट्टी लावण्यासाठी आणल्यावर त्यांनी काढलेले हे पहिले उद्गार! ते ऐकल्यावर सर्वजण जरा बिचकलोच पण भट्टी लावण्याच्या उत्सुकतेपोटी कुंभारमामांच्या या धमकीकडे आम्ही सगळ्यांनी साफ दुर्लक्ष केल.
जवळजवळ दोन-तीन महिने आमच्या दृष्टीने केलेली भरपूर मेहनत म्हणजे साधारणपणे दोनशे पॉट्स आणि इतर किरकोळ गोष्टी उन्हात बाहेर काढून ठेवल्या. जाडजूड, वेड्यावाकड्या आकारांच्या, ओबडधोबड पण आम्ही बनविलेल्या पहिल्या कलाकृती एकत्रित पहाताना मन अगदी आनंदानी उचंबळून येत होतं!
इकडे कुंभारमामांनी भट्टी लावण्यासाठी तयारी सुरू केली. विटांचा चौथरा तयार केला, जळण म्हणून पालापाचोळा, काट्याकुट्यांचा ढिग, भरपूर गवत असे सर्व जमा झाले. भट्टीची पुजा आणि त्यासाठी नारळाचीही तयारी केली. विटांच्या चौथ–यावर कुंभारमामांनी काही फाटी आणि गवत पसरले आणि आम्ही बनवलेल्या सर्व गोष्टी हळुवार एकावर एक रचल्या. त्यावर बरेचसे जळण व्यवस्थित रचले. कुठे फट राहिली आहे का? किंवा जळण कमी अधिक झालय का? वैगेरे गोष्टी तपासल्या. भट्टीभोवती दोन तिन चकरा मारून सर्वकाही व्यवस्थित असल्याची खात्री करुन घेतली. भट्टी पेटवल्या नंतर तिचा जाळ कमी पडू नये यासाठी तिच्या चारही बाजूंना उभे राहून बाजूला ठेवलेल्या जळणाचा वापर कोणी व कसा करायचा याची ’व्युव्हरचना’ केली गेली… सुचना दिल्या गेल्या. आता आम्हा सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. थोड्यावेळातच आम्ही बनविलेल्या वस्तू भट्टीत भाजून, पक्क्या होऊन निघणार होत्या.
कुंभारमामांनी जाळ पेटवायला सांगितला आणि भट्टीच्या सभोवताली फिरुन सर्व बाजूनी तिच्यावरचे जळण व्यवस्थित पेटेल याची काळजी घेतली. थोड्याच भट्टीच्या जवळ उभ रहाणे कठिण झाले. भट्टी धडाडून पेटली…
“फट.. फट.. ठॉक.. ठॉक.. फट”
भट्टी खरंच खुप जोरात पेटली होती… आणि फट.. फट आवाज करत आतील भांड्यांचे छोटे-मोठे तुकडे दूरवर उडायला लागले. क्षणातच काय होणार आहे याचा अंदाज आला. भट्टीच्या उष्णतेमुळे, तिच्यातून उडणा–या अत्यंत गरम तुकड्यांमुळे सर्वजण सुरक्षित अंतरावर जाऊन उभे राहीले व हळूच केविलवाण्या नजरेने एकमेकांकडे पाहू लागले. करता येण्यासारखे काहीच नव्हते त्यामुळे शांतपणे भट्टी संपूर्ण पेटून, थंड होण्याची वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कुंभारमामाचा चेहरा देखिल आता चांगलाच उतरला होता.
“तुमची माती येगळी हाय. आमची भांडी येवडी फुटत नायत” जाताना कुंभारमामा सांगुन गेले. त्यांनाही खरच खुप वाईट वाटल होतं. तासा-दोन तासांनी सर्वजण भट्टीजवळ गेलो. एखाद्या प्रलयानंतर उध्वस्त झालेल्या घरात काही किडूकमिडूक शिल्लक आहे का हे जसे बघतात त्याप्रमाणे ती भट्टी आम्ही पहायला लागलो. दोनशे पॉट्स पैकी एकशे शहाण्णव पॉट्स तुटले होते! आणि फक्त चार पॉट्स चांगले निघाले!
पॉटरीची किंवा कुंभारकामाची सुरवात आणि पहिली भट्टी एव्हढी धडाकेबाज होईल याची अजिबात कल्पना नव्हती.
कुंभारमामांनी लावलेली भट्टी ही अतिशय वेगात तापली, मातीच्या वस्तूंना तो तापमानवाढीचा वेग सहन झाला नाही त्यामुळे त्या पटापट फुटल्या. हे फास्ट फायरिंगचे दुष्परिणाम! आजही कुठलीही भट्टी लावताना किंवा सुरू असताना ’फास्ट फायरिंग’ तर होणार नाही ना याची धास्ति वाटतेच.
अर्थातच पुढील भट्टी ’स्लो फायरींग’ची असणार हे नक्की होतं. भाताच्या तुसात लावलेली भट्टी पुढचे चार दिवस जळत होती… सहनशक्तीची परिक्षाच! त्यामध्ये अपेक्षीत तापमान न मिळाल्यामुळे वस्तू कच्च्याच राहील्या. मग अजून वेगळ्या प्रकारच्या चौकोनी, गोल, आयताकृती आकाराच्या भट्ट्या बांधून त्यात वस्तू भाजणे सुरु झाले. तापमान किती असावे त्याचा अंदाज नुसत्या डोळ्यांनी येईना म्हणून इलेक्ट्रॉनिक टेंपरेचर मीटर घेतले. प्रयोगावर प्रयोग सुरु झाले… भट्टी, माती, विविध आकार.. कुंभाराच्या चाकावर निरनिराळ्या वस्तू तर बनवता येऊ लागल्या, पण त्या भट्टीत भाजणे हा प्रकार अजूनही चकवा देतच होता.
छंदाच्या स्वरुपात सुरु झालेल्या या कुंभारकलेला व्यावसायिक रुप देण्याची गरज वाटू लागली आणि व्यवसायाचे नामकरण झाले… ’आकार पॉट’आर्ट’.
ठाणे स्कूल ऑफ आर्टसच्या निलीमा मॅडमनी येऊरला एक पॉटरी वर्कशॉप घेतला. त्यात कुंभार सरांनी तात्पुरती भट्टी बांधून त्यामध्ये अतिशय सुंदर फायरिंग घेतले. लाकडाच्या भट्टीचा अंदाज येऊ लागला. पुढे केशव कासारांनी आकारमध्ये येउन ’डाऊन ड्राफ्ट’ प्रकाराची लाकडावर चालणारी भट्टी साध्या लाल विटा व लोखंडी अँगलचा वापर करुन तयार केली. या प्रकारच्या भट्टीत तापमान ब–यापैकी नियत्रित करता येतं. या भट्टीमुळे बनवलेल्या कलाकृती चांगल्या भाजून कणखर होऊ लागल्या.
व्यवसाय वाढू लागला. मग इलेक्ट्रीक भट्टी घेण्याची स्वप्ने पडायला लागली. एका परिचितांकडून एक छोटी भट्टी घेतली, टेस्टींगकरता, थोडी महागच होती ती… पण तिच्यातून टेस्टींग बरोबर छोट्यामोठ्या कलाकृती देखिल भाजता येऊ लागल्या.
बँकेकडून कर्ज मिळाल्यावर मग मोठ्या इलेक्ट्रीक भट्टीचा शोध सुरु झाला. मोठ्या कारखान्यांसाठी भट्टी बनविणारे काही जण भेटले पण त्यांच्या भट्ट्या खुपच महाग, अगदि आटोक्याबाहेरच्या होत्या. अशात एक अगदि ’पारखे ॲवॉर्ड विनर’ वैगेरे बिरुदावली बाळगणारा अतिशय हुशार माणूस भेटला. त्याने आमच्या गरजेनुसार पाहिजे असलेली भट्टी तुलनेनं खुपच कमी किंमतीत देण्याचे कबूल केले. ऑर्डर दिली पण भट्टी तयार होण्यास वेळ लागू लागला… मुंबईमध्ये एका प्रदर्शनात भाग घेतला होता… ती तारिखही जवळ येऊ लागली, भट्टी काही तयार होईना… छान अडचणीत सापडलो… शेवटी ती भट्टी आकारमध्ये आणली पण अनेक निरोप पाठवून सुद्धा ती अपुर्ण भट्टी जोडण्यासाठी कोणीही फिरकले नाही, भट्टी तशीच बंद अवस्थेत जागा अडवून बसली. बँकेकडून कर्ज घेउन दिलेले पैसे बुडाल्याचे दुःख तर होतेच पण त्याहिपेक्षा महत्वाची अनेक वर्षे वाया गेली ते नुकसान भरुन न येणारे होते. शेवटी अत्यंत रागानी आणि निराशेनी ती अगडबंब भट्टी मागच्या आवारातून बाहेर ढकलून दिली… पुढे भंगारवाल्यांनी तिचे बाकी सोपस्कार पूर्ण केले!
बँकेकडून आणखी थोडे कर्ज घेऊन गुजरातमधील थानगड येथून एक जरा छोटी भट्टी आणली. सुरु केल्यानंतर फायरींग व्यवस्थित झाले पण त्याचे सांगितलेले किलोवॅट आणि मीटरवर पडणारे युनिट्स यांचा मेळ काही बसेना. मग त्यांना फोन केला.
“अहो तुमच्या भट्टीच्या किलोवॅटची काहीतरी गडबड दिसतेय.”
“कशावरून?”
“तुम्ही सांगितलेल्या किलोवॅटपेक्षा जास्त युनिट्स पडताहेत.”
“तुम्ही मीटरवरुन लाईट घेतलाय का?”
“… म्हणजे? ”
“नाही, … मला वाटलं लाइनवर आकडे टाकून डायरेक्ट कनेक्शन घ्याल.!!”
“ … ? ? … ! ”
मग त्यांचा नाद सोडून दिला.
पुढे इलेक्ट्रीक भट्टीच्या कॉइल्स, त्याचे प्रकार, कॉइल्सचा रेझिस्टंन्स, ओहम्स, व्होल्ट्स, अॅम्पिअर, थ्री फेज, किलोवॅट, वैगेरे तांत्रिक मंडळीशी ओळख झाली. त्यांच्याशी दोस्ती झाल्यावर कशिबशी ही भट्टी सुरु तर झाली. मात्र भट्टी स्वस्तातली आणि सगळ्याच ठिकाणी क्वालिटीमध्ये तडजोड केलेली, फार काळ ही टिकणार नाही हे लक्षात आलं आणि झालंही तसच.
एकदा तर या भट्टीमुळे रात्री अडिच वाजता लाईटचे मिटर पेटले… इलेक्ट्रीक पोलवरच्या वायर्स पेटून लालेलाल झाल्या… मग पळापळ! रात्री वायरमन मंडळींना शोधणे… पेटलेल्या वायर खाली पडून अपघात होऊ नये म्हणून त्याची राखण करणे… फारच भन्नाट अनुभव!
लक्षात आले की आपली भट्टी आपल्यालाच बांधावी लागणार. विविध प्रकारच्या भट्ट्यांचे प्रकार, आपली गरज याचा अभ्यास सुरु झाला. लाकडावर आणि गॅसवर चालणा–या निरनिराळ्या भट्ट्या बांधून झाल्या. प्रत्येक भट्टीचे तंत्र निराळे, स्वभाव निराळा. प्रत्येक भट्टी हि अगदी आपल्यासारखीच हट्टी असते हे कळायला लागले. ती स्वतः कशी जळणार आणि आपल्याला ती कशी जळायला पाहिजे यात तफावत असल्यावर हा संघर्ष निर्माण होणारच!
भट्टीच्या कलाकलाने फायरिंग घेण्याचे तंत्र हळुहळू जमायला लागले. इलेक्ट्रीकपेक्षा लाकडावर आणि गॅसवर चालणा–या भट्ट्यांमध्ये अधिक चांगले इफेक्ट्स मिळतात हेही समजले.
यातून शेवटी एक एल.पी.जी. वर चालणारी मोठी भट्टी करण्याचे ठरले. त्यासाठी इंटरनेटवरून माहिती गोळा केली, भट्टीसाठी परदेशातून पुस्तकं मागवली. बराचश्या अभ्यासानंतर आणि संदिप मणचेकरांच्या मदतीने मोठी भट्टी बांधून झाली. या भट्टीचे सुद्धा पहिले फायरिंग फूकटच गेले, खुप जास्त तापमानामुळे वस्तू अगदि छान वितळून वेड्यावाकड्या झाल्या. पण सुरवातीच्या चार-पाच फायरिंगनंतर तिचा स्वभाव समजायला लागला. या भट्टीशी मात्र चांगलीच गट्टी जमली.
कुंभारकामाच्या या प्रवासात सुरवातीला झालेला सकारात्म संघर्ष प्रत्येक टप्प्यावर बरेच काही शिकवून गेला. हुकुमत गाजवून कुठलिही गोष्ट एका मर्यादेपर्यंतच करता येते… एकमेकांच्या क्षमता लक्षात घेवून केलेला प्रवास आता अधिक समृध्द ठरतो आहे.
काही वर्षांनी पुन्हा भेट झाल्यावर त्या कुंभारमामाना आग्रहानी आमची प्रगती बघायला आणले. त्यांना नवीन भट्ट्याही दखवायच्या होत्याच. आकारमधे आल्यावर त्यांची अगदि उत्स्फुर्त प्रतिक्रीया आली, “आरे तुमी आजून हाव काय? माला वाटला कंवाच धंदा बंद करुन गेला आसाल…!”

