नीरजा | चतुरंग, लोकसत्ता | March 16, 2019
केरळमधील कोचीन येथे दर दोन वर्षांनी भरणारं कला प्रदर्शन म्हणजेच ‘कोची बिनाले’. येथील इमारतीतलं प्रत्येक दालन भरलं होतं कलाकारांच्या मनातल्या अस्वस्थतेनं, कधीतरी अचानक कळलेल्या किंवा कळलं असं वाटणाऱ्या जगण्यानं, हव्याशा वाटणाऱ्या स्वातंत्र्यानं, खूप आत दडलेल्या भयानं, सगळं संपून गेल्याच्या भावनेनं, नराश्यानं आणि मनात भरून आलेल्या करुणेनंही..
अनेक दालनांचा भलामोठा प्रासाद. प्रत्येक दालनात शेकडो रंगांची उधळण कोऱ्या कॅनव्हासवर. या रंगातून वाट काढत आपण चालू लागतो तेव्हा अनेकदा मनात पारंपरिक कलादालनांचं चित्र असतं. सौंदर्याची आभा पसरलेली कलेची दालनं म्हणजे मुक्त ठेवाच असतो आपल्यासाठी. या दालनात निसर्गाचे विविध विभ्रम, राजा रविवर्मा यांच्या चित्रांसारखे वेगवेगळे चेहरे, वेगवेगळ्या भावमुद्रा, शरीराची वेगवेगळी ठेवण असलेल्या मोहवणाऱ्या स्त्रिया दिसतील असं वाटतं. पण त्याऐवजी समोर येतात देवाच्या बागेतील सफरचंद छातीवर पेलून योनीतून हसणारी मुक्त तरुणी. झुळझुळणारी पाण्याची धार नाही दिसत कुठंच. दिसतात ते अचानक आलेले आणि सारं उद्ध्वस्त करणारे पूर. छताला लटकलेल्या खांबांना लगडलेली आणि टोकदार बाणांनी आरपार छेदलेली हजारो माणसं.
खरं तर हे आर्ट फेस्टिव्हल पाहणं ही एका दिवसात फिरून उरकण्याची गोष्ट नाहीच. एखादी दीर्घ कविता पुन:पुन्हा वाचत जावी आणि प्रत्येक वेळी ती नव्यानं समजून यावी असं काहीसं असतं कोणत्याही कलेचं. इथंही तोच अनुभव येतो. संपूर्ण कोची शहरात अनेक ठिकाणी ही ‘इन्स्टॉलेशन्स्’ दिसतात आपल्याला. हातातला नकाशा सांभाळत अख्खं कोची शहर पालथं घालावं लागतं तेव्हा कुठे हाती काहीतरी लागल्याचा आनंद मिळू शकतो आपल्याला. या कलोत्सवात केवळ सर्जनाचा आविष्कार नव्हता तर सोबत वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना आणि जगण्यातल्या गुंत्यांना भिडण्याचा प्रयत्न करत होते लोक. आणि त्याविषयीच्या चर्चाही रंगत होत्या वेगवेगळ्या मंचावरून.
१२ डिसेंबर २०१८ पासून जगातल्या अनेक कलाकारांच्या कलाकृती ‘कोची बिनाले’मध्ये आपली वाट पाहताहेत. महाराष्ट्रातील अनेक कलाकार इथं पोचलेले आहेत. महाराष्ट्रातील कोकणातील माणगाव-इंदापूरजवळ असलेल्या आकार पॉटसचे, आपल्या बोटांनी अनेक आकार-चेहरे घडवणारे राजेश कुलकर्णी, सुप्रसिद्ध चित्रकार राजू सुतार, वैशाली ओक, संगीत आणि नृत्यातून बोलणारे ऋषिकेश पवार, संदीप सोनावणे अशा अनेक दिग्गजांचा सहभाग या ‘बिनाले’मध्ये आहे. राजेश कुलकर्णी यांनी उभं केलेलं अनेक छोटय़ा मोठय़ा मातीच्या कुंभांचं, चेहऱ्यांचं, मुखवटय़ांचं, वस्तूंचं जाळं म्हणजे जणू काही अनेक धाग्यांत बांधून उभा केलेला समाजच होता आपला. प्रेम, विश्वास आणि बंधुभावाच्या नाजूक धाग्यांनी बांधलेला समाज नावाचा डोलारा लांबून सुंदरच दिसत असतो. पण त्या धाग्याला भय आणि हिंसेचं नख जरी लागलं तरी कोसळू शकतो हा सारा समाज आणि उद्ध्वस्त होऊ शकतो हेच जणू सांगण्याचा प्रयत्न करत होता हा कलाकार.
